लोकसभा – 2024 च्या निवडणुकीस सामोरे जाताना – बी.व्ही. जोंधळे

लोकसभा – 2024 च्या निवडणुकीस सामोरे जाताना – बी.व्ही. जोंधळे

काँग्रेस पक्षाने कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत जो दणदणीत विजय मिळवून भाजपचा सणसणीत पराभव केला त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँगे्रस व भाजपविरोधी पक्षांचा निर्णायक विजय होऊन केंद्रात सत्तापालट होईल असा निष्कर्ष काढणे घाईचे होईल. भारतीय मतदार लोकसभा व विधानसभा निवडणुकीत फरक करीत असतो, हे लक्षात घेता हमखासपणे केंद्रातून भाजप सत्ताच्युत होईल, असे म्हणूनच म्हणता येत नाही. भाजपच्या जिव्हारी कर्नाटकचा पराभव निश्‍चितपणेच झोंबला असून चोवीस तास निवडणुकीचे राजकारण करणारा भाजप 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नव्या जोमाने व पूर्ण ताकदीने उतरेल हे सांगण्यासाठी म्हणूनच कुणा ज्योताशीची गरज नाही. शिवाय 2025 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेस शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी साजरी करीत असताना म्हणूनच देशाची सत्ता भाजपच्या हाती असावी, यासाठी भाजप जीवाची बाजी लावून निवडणुकीच्या राजकारणात उतरेल, हे स्पष्टच आहे.
कर्नाटक विधानसभेचा काँगे्रसी विजय काँग्रेसला पुनुरूज्जीवन करण्यासाठी निश्‍चितच लाभदायक ठरणारा आहे हे खरे. उदा. आणीबाणीनंतर 1977 च्या निवडणुकीत रायबरेली मतदारसंघातून इंदिरा गांधींचा पराभव झाला होता. केंद्रात तेव्हा जनता पक्षाचे सरकार आले होते. पण इंदिरा गांधींच्या या अपमानास्पद पराभवानंतर एका वर्षाने म्हणजे 1978 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत कर्नाटकच्या चिकमगळूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवून इंदिरा गांधींनी दणदणीत विजय मिळवून संसदेत पुनरागमन केले होते. इंदिरा गांधींच्या या विजयामुळे तेव्हा काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाली होती. परिणामी 1980 च्या लोकसभा निवडणुकीत काँगे्रसने ऐतिहासिक विजय मिळविला होता व इंदिराजी गांधी पंतप्रधान झाल्या.
दुसरे उदाहरण सोनिया गांधींचे. राजीव गांधींच्या हत्येनंतर आठ-नऊ वर्षे सक्रीय राजकारणापासून दूर राहिलेल्या सोनिया गांधींनी खूप उशिरा राजकारण प्रवेश केला. 1999 च्या लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधींनी अमेठीबरोबरच कर्नाटकातील बळ्ळारी लोकसभा मतदार संघाचीही निवड केली. भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधींपुढे जबरदस्त आव्हान उभे केले होते. पण मतदारांनी प्रचंड मतांनी सोनिया गांधींना विजयी करून भाजपच्या सुषमा स्वराज यांचा दणदणीत पराभव केला होता. कर्नाटकातील इंदिरा गांधी व सोनिया गांधी यांचे हे विजय लक्षात घेता काँगे्रसच्या पुनुरुज्जीवनाचा प्रारंभ कर्नाटकातून होतो, असे मानून आगामी लोकसभा निवडणुकीत काँगे्रसच विजयी होईल, असे अनुमान काढणे घाईचे ठरेल. कारण समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी व निवडणुकीच्या राजकारणात निपूण असलेल्या भाजपचे तगडे आव्हान आहे, हे विसरता येत नाही.
अर्थात, तरीही काँगे्रसला आणि विरोधी पक्षांना एक आशा जरूर धरता येईल ती अशी, की भाजपच्या धर्मांध राजकारणापासून मतदार दूर जात आहेत हे जसे खरे आहे, तसेच हिंदू मतपेढी म्हणजे आपली खासगी मालमत्ता आहे, या भाजपच्या भ्रमाचाही भोपळा फुटू लागला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने हिजाब-गोमांस-औरंगजेब-टिपू सुलतान अशा अनेकांचा वापर करून पाहिला. मुस्लिमांचे आरक्षण रद्द केले. शेवटी तर बजरंगबलीसही वेठीला धरले. पण या कशाचाही उपयोग न होता लोकांनी पोटापाण्याचा प्रश्‍न महत्त्वाचा मानून काँग्रेसच्या पारड्यात विजयाचा कौल दिला.
तात्पर्य, हिंदू मतदार म्हणजे आपली हक्काची ठेव आहे, असे भाजप मानत आला. पण भाजपचा हा समजही हिंदू मतदारांनी आजवर खोटाच ठरविला. उदा. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळविला. पण पाठोपाठ झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत हिंदू मतदारांनीच ‘आप’ला विजयी करून भाजपचा पराभव केला. दिल्लीच्या पाठोपाठ याच काळात पंजाब विधानसभेच्या दोन निवडणुका झाल्या. या दोन्ही निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. म्हणजे इथेही हिंदू मतदारांनी भाजपला नाकारले. बिहार विधानसभा निवडणुकीतही असेच घडले. इथेही भाजपचा पराभव झाला. बिहारचे हिंदू भाजपच्या बरोबर नव्हे, तर लालूप्रसाद व नितीशकुमार यांच्याबरोबर राहिले. मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, तेलंगणा येथिल हिंदूंनी भाजपला साथ दिली नाही. पश्‍चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तेथील हिंदू मतदारांनी हनुमान चालिसा म्हणणार्‍या भाजपस साथ न देता देवीस्तोत्र गाणार्‍या तृणमूल काँग्रेसला पसंत केले. कहर झाला तो कर्नाटकाच्या ताज्या विधानसभा निवडणुकीत. या निवडणुकीत भाजपने 69 लिंगायत उमेदवारांना उमेदवारी दिली होती. पण निवडून आले अवघे पंधरा. याउलट काँग्रेसने 46 लिंगायतांना उमेदवारी दिली, यातील 37 जण विजयी झाले. अर्थ असा, की भाजपच्या ध्रुवीकरणी व जातीय राजकारणाचा कर्नाटकी मतदारांनी पराभव केला. म्हणून लगेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेपासून दूर जाईल असे म्हणता येत नाही. 2024 च्या निवडणुकीत भाजपस जर सत्तेपासून दूर ठेवायचे असेल, तर काँग्रेसने कर्नाटकात लोकांच्या जीवन-मरणाच्या प्रश्‍नांना जसे प्राधान्य दिले, तसेच ते लोकसभा निवडणुकीतही देताना भाजप विरोधी पक्षांनी काँगे्रससह एकत्र येऊन भाजपविरोधी निवडणूक लढविली, तर निश्‍चितपणे निर्णायक विजयाची आशा धरता येईल. तूर्त इतकेच. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.