मुख्यमंत्र्यांना सूचक इशारा! – बी.व्ही. जोंधळे

मुख्यमंत्र्यांना सूचक इशारा! – बी.व्ही. जोंधळे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 288 पैकी 240 जागा लढवील असे म्हटल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. बावनकुळे यांच्या विधानाचा अर्थ असा, की विधानसभेच्या 288 जागांपैकी 240 जागा जर भाजप लढविणार असेल, तर शिंदे गटाच्या वाट्याला अवघ्या 48 जागा येणार. यामुळे शिंदे गट अस्वस्थ होणे स्वाभाविक होते. झालेही असेच. नंतर बावनकुळे यांनी आपण ते विधान गमतीने केले असे जरी म्हटले असले, तरी भाजपचा ‘वापरा आणि फेकून द्या’ या राजकीय रणनितीचा प्रत्यय बावनकुळेंच्या विधानातून आल्यावाचून राहिला नाही. चंद्रशेखर बावनकुळेंनी शिंदे गटाला त्यांची जागा दाखविणारे हे जे विधान केले ते अजाणतेपणाने केले असावे, असे मानता येणार नाही. कारण यापूर्वी सुद्धा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद आम्ही मनावर दगड ठेऊन स्वीकारले आहे’ असे विधान केले होते, हे वाचकांना स्मरतच असेल. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या साथीने महाविकास आघाडी स्थापन करून देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद हिरावून घेऊन स्वतः जेव्हा मुख्यमंत्रीपद मिळवले तेव्हापासून भाजप ठाकरेंचे सरकार पाडण्याच्या कारस्थानात दंग होता, हे उघड आहे. अखेर साम, दाम, दंड, भेदनीतिचा अवलंब करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोडताना भाजपने शिवसेनेत उभी फूट पाडून ठाकरे सरकार उलथवून लावले. तेव्हा कुठे भाजपचा राजकीय अतृप्त आत्मा शांत झाला. पण तरीही मुख्यमंत्रीपद भाजपला म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना न मिळाल्यामुळे भाजपत जी धुसफुस सुरू होती नि आहे तीच चंद्रशेखर बावनकुळे व चंद्रकांत पाटील या आजी माजी प्रदेशाध्यक्षांच्या मुखावाटे बाहेर पडली आहे. हेच काय ते खरे आहे. भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता जे सरकार स्थापन केले आहे त्या सरकारला हिंदुत्वाचा कितीही मुलामा दिला, तरी ते काही फारसे खरे नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून उद्धव ठाकरेंनी जे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते, त्या सरकारात विद्यमान मुख्यमंत्री व आताचे त्यांचे सहकारी सामील होते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एवढेच वावडे होते, तर तेव्हाच विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे सरकारात सामील व्हायला नको होते. पण ते झाले. अडीच वर्षे ठाकरे सरकारात महत्त्वाची खाती सांभाळत आले आणि अडीच वर्षांनंतर त्यांना साक्षात्कार झाला, की उद्धव ठाकरेंनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून जे सरकार स्थापन केले त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वापासून उद्धव ठाकरे दूर गेले. अर्थात, हा सारा षड्यंत्री चमत्कार भाजपच्या कुटील राजकीय डावपेचांचा भाग होता. आता उद्धव ठाकरे सरकार पाडून झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांची जागा दाखविण्याचा खेळ भाजप करीत असेल, तर नवल ते कोणते? आणि भाजपच्या या राजकीय खेळात नवीन ते काय आहे? उदा. आसाम गणपरिषद, गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, पंजाबमध्ये अकाली दल किंवा आपल्या महाराष्ट्रात शिवसेनेचा वापर करून घेतल्यानंतर भाजपने या पक्षांना संपविण्याचेच कारस्थान तडीस नेले, हे दिसतेच आहे. तेव्हा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखन बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढविणार आहे असे विधान केले असेल, तर ते अनाहूतपणे केले असे कसे बरे म्हणता येईल? आता एक खरे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या प्रत्येक दौर्‍यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक करीत असतात. याचे कारण असे, की आरेतील कारशेडपासून बुलेट ट्रेनपर्यंतच्या सार्‍या भाजपच्या योजना मुख्यमंत्री शिंदे राबवित असल्यामुळे! याचा अर्थ ते व अमित शाह एकनाथ शिंदेंना ‘नाकापेक्षा मोती जड’ होऊ देतील असे नव्हे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 व अपक्ष आणि अन्य लहान पक्षांचे 10 अशा 50 जणांच्या बळावर राज्यात आपले सरकार आणले. आता चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात तसे शिंदे गटाच्या वाट्यास अवघ्या 48 जागा येणार असतील, तर त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांची सोय कशी करावयाची, हा मुख्यमंत्र्यांसमोर एक जटील प्रश्‍न उभा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेनेचा व धनुष्यबाणाचा ताबा दिल्यामुळे उरलेल्या उद्धव ठाकरे गटात फूट पाडणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सोयीचे वाटते. पण त्यांच्या वाट्याला अवघ्या 48 जागाच जर येणार असतील, तर ठाकरे गटाच्या शिवसेनेला अजून खिंडार पाडणे मुख्यमंत्र्यांना अवघड जाईल. अशावेळी उद्धव ठाकरेंची शक्ती वाढूही शकते. या पेचातून मार्ग काढण्यासाठी भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जरूर चुचकारत राहील. पण तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद पाहूनच त्यांना विधानसभा निवडणुकीत जागा सोडण्यात येतील, हे उघड आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी भलेही जागावाटप अजून ठरलेले नाही, असा जरी खुलासा आता केलेला असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जागावाटपाच्या संदर्भात सूचक इशाराच दिला आहे. असा निष्कर्ष काढला, तर तो फारसा चुकू नये. 

— बी.व्ही. जोंधळे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.