डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धर्मविचार – डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धर्मविचार – डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी

डॉ. आंबेडकरांचा धर्मविचार हा मुळातच एकूण धर्म या संकल्पनेचाच पुनर्विचार असून तो धर्माला अधिक न्याय्य आणि सुयोग्य पायावर उभा करणारा धर्मविचार ठरलेला आहे.सामाजिक परिवर्तनाला बांधलेला तो विचार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या सुरुवातीपासूनच्या लेखनात धर्म विषयक विचारांची मांडणी करतांना धर्माची गरज ही सततच प्रतिपादन केलेली आहे. धर्माबाबत विचार मांडताना ‘धर्म ही अफूची गोळी आहे’ एवढेच मार्क्स म्हणाल्याचे प्रचारित करून मार्क्सबद्दल भ्रम निर्माण केला जातो. मुळात मार्क्सचे धर्माबाबतचे ते पूर्ण मूळ विधान हे Religion is the opium of the people. It is the sigh of the oppressed creature, the soul of our soulelless conditions असे आहे. म्हणजे आत्मा गमावून बसलेल्या आपल्या परिस्थितीचा धर्म हा आत्मा असून दबलेल्या, पिचलेल्या लोकांचा तो उसासा आहे. म्हणजेच मानवी समाजातले धर्माचे महत्त्व मार्क्स नाकारत नाही, तर ते अधोरेखित करतो. त्याचे धर्माबाबतचे मतही नकारात्मक वा धर्मविरोधी नाही.
मुळात मार्क्स जर्मन भाषेत लिहीत असे. Volk असा जो जर्मन शब्द मार्क्सने वापरला त्याचा अर्थही ‘मासेस’ पेक्षा ‘लोक’ असाच असल्याचे सांगितले जाते. मार्क्सने हे विचार मांडले त्या काळात अफू ही फक्त मादक, गुंगी आणणारी वस्तू म्हणून बघितली जात नव्हती. त्यावर बंदीही नव्हती अथवा तिचा वापरही करणे बेकायदेशीर नव्हते. उलट अफूचा मोठ्या प्रमाणावर वापर हा औषधी स्वरूपाचा होता. मार्क्सने धर्माला अफू त्या औषधी उपयोगाच्या अर्थाने म्हटले होते.


माणूस हा धर्माचे साधन नव्हे


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही धर्माचे मानवी समाजातले स्थान नाकारलेले नाही.त्यांना धर्म हवाच आहे, मात्र तो विषमतामूलक नको आहे. धर्माच्या नावावर ढोंग त्यांना नको आहे. धर्माला ते माणसाची प्रेरक शक्तीही मानतात. धर्म माणसात आशा निर्माण करतो आणि माणसाला कृतिप्रवण करतो, असेही ते मानतात. त्यांच्या मते, धर्म हा माणसाची सेवा करण्यासाठी आहे. माणूस हा धर्माचे साधन नव्हे, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही, असे ते सांगतात. आज तर त्यांचे हे म्हणणे अधिक मोठ्याने व ठसठशीतपणे मांडण्याची गरज आहे. कारण सार्‍या जगभरच मूठभरांच्या हातीच तेवढी संपत्ती संचय करून घेण्यासाठी व त्याकरता सत्ता आणि वर्चस्व टिकवून धरण्यासाठी, माणसांना धर्मयुद्धात गुंतून पडण्याची दीक्षाच दिली जाते आहे. धर्मद्वेष व धर्मभेद अधिक टोकाचे करणारे राजकीय, आर्थिक आणि वर्चस्व हितासाठीचे धार्मिक ध्रुवीकरण करत सत्ता, वर्चस्व टिकवले जाते आहे.
मार्क्स असो, विवेकानंद वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर अथवा डॉ. पंजाबराव देशमुख  हे महापुरुष मुळातच मानवतावादी आणि मानवाधिकाराची प्रतिष्ठापना करणारे आहेत. धर्माला विघातक आणि विकृत वळण दिले जाण्याच्या विरोधातच ते उभे असून धर्म ही माणसाच्या व समाजाच्या जीवनातली विधायक शक्ती या स्वरूपातील धर्मविचार हे त्यांच्यातले साम्य आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवितकार्यच मुळी हिंदू धर्म सुधारणा व त्या धर्माला विधायक, तार्किक वळण लावणे हे होते.
धर्माचे तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, विविध धर्म, त्यांचे स्वरूप या सार्‍यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय सखोल, चिकित्सक आणि तुलनात्मक अध्ययन केले होते. त्यांच्या धर्मविषयक शास्त्रीय, पद्धतशीर आणि सर्वांगीण अध्ययनाचा हेतू ज्या धर्मात ते जन्माला आले होते, त्या हिंदू धर्माची समग्र चिकित्सा करून त्यात बदल घडवण्याचाच होता. धर्म ही संज्ञा बाबासाहेब धर्मशास्त्र या अर्थाने वापरतात. सकारात्मक धर्माची वैशिष्ट्ये मांडतांना बाबासाहेब म्हणतात, की सकारात्मक धर्माची वाढ ही आदिम धर्माप्रमाणे झालेली नाही. त्याचे मूळ हे महान धार्मिक नवकल्पकांच्या शिकवणुकीत असते, असे ते सांगतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्माचा अर्थ अशी आदर्श व्यवस्था, जिचे उद्दिष्ट लोक एका नैतिक व्यवस्थेत जगतील, अशी समाजव्यवस्था निर्माण करणे, हा घेतात. त्यांच्या सर्व धर्मविषयक विचारांचा पायाही तोच आहे.
कोणत्याही धर्मातला निश्‍चित, स्थायी आणि प्रभावी भाग म्हणजे काय हे विशद करणे हे नेहमीच कठीण काम असते, असे ते सांगतात. त्याचप्रमाणे धर्माची आवश्यक वैशिष्ट्ये त्यातल्या अनावश्यक भागापासून वेगळी करणे हेदेखील सोपे काम नसल्याचे ते सांगतात. त्यांचा धर्मविचार हे काम करत होता आणि ते करून खरा धर्म ते मांडत होते. प्रोफेसर रॉबर्टसन स्मिथ यांचे, धर्माचे जुने आणि नवे स्वरूप दोन्हीही सोबतच टिकवले जाते हे म्हणणे उद्घृत करत भारतात तर हेच झाले आहे, हे डॉ. बाबासाहेब सांगतात.
एकेकाळी जीवनविषयक सार्‍याच बाबी, शास्त्र, विज्ञाने, सर्वच प्रकारच्या ज्ञानाचे स्त्रोत या स्वरूपात असलेले धर्माचे हे विशाल, व्यापक साम्राज्य बाबासाहेबांच्या मते, कोपर्निकस, डार्विन यांच्या वैज्ञानिक, सैद्धांतिक मांडणीनंतर उद्ध्वस्त होत गेले. ही ते मोठीच क्रांती मानतात. सुमारे चारशे वर्षे विज्ञान आणि धर्मशास्त्र यांच्या सुरू असलेल्या संघर्षाचा तो परिणाम होता, असे ते म्हणतात. या क्रांतीमुळेच विचारस्वातंत्र्याची प्रतिष्ठापना झाली, इहवादीकरणाच्या या प्रक्रियेचे केवळ वैज्ञानिकांनीच तेवढे स्वागत केले असे नाही, तर धार्मिक असलेल्यांनाही त्यामुळे धर्मशास्त्र म्हणून शिकवल्या गेलेल्या कितीतरी बाबी या अनावश्यक आणि त्यांच्या धार्मिक जीवनात अडथळे आणणार्‍या असल्याचे जाणवत गेले आणि त्यांनाही ही प्रक्रिया स्वागतार्ह वाटली, असे बाबासाहेब म्हणतात.
ईश्‍वर ही संकल्पना धर्माचा अविभाज्य भाग नाही, ती धर्मात कशी शिरली हे सांगणे कठीण आहे, असे सांगत बाबासाहेब म्हणतात, की धर्म आणि नैतिकता यांचा संबंध मात्र अविभाज्य स्वरूपाचा आहे. मानवी अस्तित्वाशी तो संबंधित आहे. जन्म, मृत्यू, जीवन, लग्न यांसंदर्भात धर्म आणि नैतिकता या परस्परसंबंद्ध बाबी आहेत. धर्म या बाबींच्या पवित्रीकरणाशी, तर नैतिकता त्यांचे रक्षण करणार्‍या नियमांशी संबंधित असते. हे नाते धर्म आणि ईश्‍वर यांच्या संबंधांपेक्षा अधिक नैसर्गिक होते. मात्र या बाबी परस्परसंबंद्ध केव्हा झाल्या असतील, हे सांगता येणे सोपे नाही. बाबासाहेबांनी माणसाच्या आदिम अवस्थेपासून तो आधुनिक अवस्थेपर्यंत बदलत गेलेल्या धर्मस्वरूपाची तपशीलवार चर्चा केलेली आहे. तसेच धर्मबदलाचेदेखील स्वरूप ओल्ड टेस्टामेंटमधील दाखला देत त्यांनी स्पष्ट केले आहे. प्राचीन जगात राष्ट्रीयत्वाचा बदल म्हणजे संप्रदाय बदल असे, तर सामाजिक संलयन म्हणजे धार्मिकच असे, असे ते म्हणतात. आधुनिक समाजात सामाजिक अभिसरणासाठी धर्म गुंडाळून ठेवण्याची वा दुसरा धर्म स्वीकारण्याची गरज नाही.


हिंदूंची समाजव्यवस्था बंधुतेच्या विरोधात आहे


बाबासाहेब प्राचीन काळापासूनच्या धर्म संकल्पनेची विविध अंगाने तपासणी करत धम्म विचारापर्यंत आले होते. हिंदू जीवनाचे तर क्षणोक्षणी नियमन धर्म करत असतो, अशी कोणतीही बाब नाही, की जी हिंदू धर्मात धर्माने नियंत्रित केली जात नाही. बाबासाहेबांनी आपण हिंदू धर्माची चिकित्सा ही न्याय्य वागणुकीच्या निकषावर करतो आहोत, कारण स्वातंत्र्य, समता, बंधुता याचेच दुसरे नाव न्याय आहे, असे म्हटले होते. हिंदूंची समाजव्यवस्था ही समता आणि बंधुता यावर आधारलेली नसून ती श्रेणीबद्ध विषमता, स्थायी आणि अपरिवर्तनीय वंशपरंपरागत व्यवसाय, वर्णव्यवस्था या पायावर उभी आहे आणि ती बंधुतेच्या विरोधात आहे. समतेचे तत्त्व ती मान्य करत नाही, तर विषमतेला ती अधिकृत तत्त्वज्ञान मानते. व्यवसाय हे जन्मजात जातीने निश्‍चित झालेले म्हणून त्याचेही स्वातंत्र्य नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे; पण ते त्या समाजव्यवस्थेच्या बाजूनेच बोलणार्‍यांसाठी, ते व्होल्टेअरच्या संकल्पनेप्रमाणे दुसर्‍याचे म्हणणे मान्य करणारे व त्यासाठी झगडणारे नाही, अशी मांडणी बाबासाहेब हिंदू धर्माची चिकित्सा करताना करतात.
ही सामाजिक व्यवस्था व्यक्तीधिष्ठित नसून वर्णाधिष्ठित आहे. पहिल्या वर्णाची व्यक्ती शेवटच्या वर्णाची आणि शेवटच्या वर्णाची ही पहिल्या वर्णाची कधीच होऊ शकत नाही, अशी कप्पेबंद सामाजिक व्यवस्था हे हिंदू धर्माचे ते व्यवच्छेदक लक्षण सांगतात. नित्शेचा सुपरमॅन आणि मनूने कल्पिलेला श्रेष्ठ मानव हे एकच असल्याचे बाबासाहेब म्हणतात. नित्शेचे ‘दस स्पेक झरतृष्ट’ ही दुसरी मनुस्मृतीच ते मानतात. मात्र नित्शे आणि मनू यांच्यातला फरकही त्यांनी स्पष्ट केला आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख यांनी ‘वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास’ हा त्यांचा विद्वत्तापूर्ण प्रबंध मांडून केलेल्या धर्मचिकित्सेअगोदर बाबासाहेबांनी आर्यांचे सखोल अध्ययन सुरू केले होते. त्याचा संदर्भ बुद्धाने नेमकी कोणती धम्म क्रांती केली तिचे स्वरूप जाणून घेण्यासाठीचा होता. मात्र, “The Ancient Regime: The State of Aryan Society” हा त्यांचा महाराष्ट्र शासन प्रकाशित त्यांचे लेखन व भाषणे, खंड 3 मध्ये समाविष्ट मूळ निबंध हा अपूर्णच राहिलेला आहे.
मात्र याच खंडात पुढे प्रकरण 8 मध्ये समाविष्ट “Reformers and Their Fate’ ’हा जो निबंध दोन भागात आहे, त्याचा पहिला भाग हा Aryan Society असा आहे. त्यात त्यांनी आर्य धर्माचे यज्ञ स्वरूप व त्यात द्यायच्या 21 प्रकारच्या आहुत्या, बळी याचे वर्णन केले आहे. त्याचा हेतू या धरातलावर चांगल्या गोष्टी मिळवण्याचा सांगितला आहे. धर्माचे हे स्वरूप वैदिक धर्माचे रूपांतर पुरोहित धर्मात झाल्यानंतरचे आहे. यज्ञसंस्थेच्या त्या पार्श्‍वभूमीवर बुद्ध विचारांचा उदय कसा झाला, हे सांगण्यासाठी त्यांनी ते मांडले आहे.


तो धर्म नसून ती थट्टा आहे


जो धर्म इतर धर्मियांसोबत मानवतेचे वर्तन शिकवत नसेल, तो अन्य काहीही नसून शक्ती प्रदर्शन आहे, असे ते म्हणत. जो धर्म पशूचा स्पर्श सहन करतो; पण माणसाचा सहन करत नाही, तो धर्म नसून ती थट्टा आहे, असे मत ते मांडतात. जो धर्म विशिष्टच वर्गाला शिक्षणापासून,  संपत्तीपासून, शस्त्र धारण करण्यापासून वंचित राखतो, तो धर्म नसून थट्टा आहे, असे ते मानतात. जो धर्म दरिद्री आणि अज्ञानी लोकांना दरिद्रीच राहायला बाध्य करतो, तो धर्म नसून संकट असल्याचे ते सांगतात. माणसाचे स्वत्व जपणे हे जो धर्म पाप मानतो, तो धर्म नसून तो ते आजार मानतात.
आचार्य अत्रे यांनी बाबासाहेबांच्या बाबतीत लिहितांना असे म्हटले होते, की मनुष्याच्या शरीराचा, बुद्धीचा आणि आत्म्याचा कोणत्या धर्मामध्ये जास्तीत जास्त विकास होईल याची त्यांना चिंता लागून राहिलेली आहे. त्यांना हिंदू धर्म पाहिजे आहे; पण चातुर्वर्ण्य नको आहे. त्यांची धर्मांतराची चळवळ ही हिंदू धर्माच्या विध्वंसाची नसून ती हिंदू धर्माच्या सुधारणेची चळवळ होती.चातुर्वर्ण्याची हुकुमशाही नष्ट करून हिंदू धर्माची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा, असे टाहो फोडून ते सांगत आहेत.


तत्सम कार्य करणार्‍यांना आजही जीवे मारण्याच्या धमक्या!


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धर्मविचार हा मुळात हिंदू धर्मसुधारकाचा. तो धर्म परिष्कृत करण्यासाठी समता, बंधुता, मानवता, स्वातंत्र्य या पायावर तो उभा करण्यासाठीचा धर्मविचार होता व हे विवेकी विद्वांनांनाही पटले होते. त्यांच्या धर्मविचारांचे सार म्हणजे डॉ. गंगाधर पानतावणे यांनी म्हटल्याप्रमाणे, धर्म आणि समाज यांचे पृथकत्व त्यांना अभिप्रेत आहे. 15 मार्च 1929 च्या ‘बहिष्कृत भारत’च्या अंकात बाबासाहेबांनी हेच ठामपणे सांगितले, की हिंदू समाजात धार्मिक सुधारणेखेरीज सामाजिक सुधारणा होणे शक्य नाही. त्यांचे हे भाकित आज सुमारे शंभर वर्षानंतरही खरेच ठरलेले आहे.
सुधारणांचे कायदे झाले मात्र मनाने ते पूर्णपणे स्वीकारले गेले का? हा प्रश्‍न शिल्लकच आहे. तसे नसते तर महाराष्ट्रात झालेला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा परत घेण्याची मागणी करणारे कशाला उभे झाले असते? पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी, गौरी लंकेश अशा सुधारकांच्या हत्या का झाल्या असत्या? तत्सम कार्य करणार्‍यांना आजही जीवे मारण्याच्या धमक्या कशाला दिल्या गेल्या असत्या? खरे तर 1927 पासूनच बाबासाहेबांनी त्यांच्या धर्मविचारांच्या आणि धर्मसंकल्पनेच्या आधारावर हिंदूधर्मीय समाजाची पुनर्रचना ही एकवर्ण व समता या पायावर करण्याची जाहीररीत्या जबाबदारी स्वीकारली होती. त्या दृष्टीने सर्व हिंदूधर्मीय लोक हे एकवर्णीय समजण्यात यावेत. हिंदू या संज्ञेने हा वर्ग ओळखण्यात व संबोधण्यात यावा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र वगैरे वर्णविषयक संज्ञांनी अगर महार, मांग वगैरे जातीविषयक संज्ञांनी स्वतःला अगर दुसर्‍याला संबोधण्याची कायदेशीर मनाई करण्यात यावी, असे या परिषदेचे मत आहे, असा ठराव करून समाजाचे स्वरूप  त्यात दर्शविण्यात आल्याचे ‘विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत भारतीय समाज पुनर्रचना’ या “Dr. Babasaheb Ambedkar : The Architect of Modern India” या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रकाशित शताब्दी ग्रंथातील, एन.जी. कांबळे यांच्या लेखात म्हटलेले आहे.
याचा अर्थ डॉ. आंबेडकर यांचा धर्मविचार हा आधुनिक भारतीय समाजाचे नीलचित्र तयार करण्यासाठी, मोठ्या संख्येच्या असलेल्या हिंदू धर्मातच अंतर्बाह्य बदल घडवण्यासाठी जन्माला आलेला विचार होता. धर्म हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो स्वतःपुरताच मर्यादित ठेवावा. सार्वजनिक जीवनात त्याला स्थान नाही, असे बाबासाहेब सांगतात.


धर्म हे अन्याय करणार्‍या व्यवस्थेचे नाव


प्रत्येक धर्म नीती शिकवतो. पण नीती हे धर्माचे मूळ नाही, ती धम्मात आहे. कारण तो सार्वजनिक आहे. धम्माचे बाबासाहेबांनी जीवनशुचिता, पूर्णता साधणे, निब्बाण, तृष्णात्याग, सर्व संस्कारित गोष्टींची अनित्यता आणि कर्म हे नैतिक व्यवस्थेचा आधार असे सहा भाग केले आहेत. तर दैवी चमत्कृतीवर विश्‍वास, ईश्‍वरावर विश्‍वास, ब्रह्मसायुज्य, धर्मग्रथांचे केवळ पठण, धर्म पुस्तके प्रमादित मानणे याला त्यांनी त्यांच्या धर्मविचारात अधम्म ठरवले आहे.
या उलट मनाची मलिनता दूर करणे, जग हे धम्मराज्य बनवणे, सर्वांना ज्ञानाचा मार्ग खुला असणे, प्रज्ञेला उत्तेजन, सोबतच शील, मैत्री, करूणा यांचे महत्त्व जपणे याला ते सद्धम्म म्हणतात. त्यांच्या धर्मविचारांचे उद्दिष्ट हे अखिल मानवजातीला सामाजिक विषमतेकडून सामाजिक समतेकडे नेण्याचे आहे. त्यांच्या मते, जोपर्यंत समाजव्यवस्थेकडे धर्म म्हणून बघण्यात येते तोवर त्यात परिवर्तन शक्य नसते. कायद्यात मात्र बदल करता येतात. जो धर्म दोन अनुयायांमध्ये भेदभाव करतो आणि कोट्यवधींना यातनाच देतो तो ते मुळात धर्मच मानत नाहीत. धर्म हे अन्याय करणार्‍या व्यवस्थेचे नाव नव्हे, असे ते सांगतात.


डॉ. आंबेडकरांचा धर्मविचार माणसाच्या ऐक्याची मांडणी करणारा


बाबासाहेबांच्या मते, धर्म हा सामाजिक नितीमत्तेवर आधारलेला असायला हवा, तसेच तो सामाजिक निकषांवरच तपासायला हवा. धर्माची नाळ ते लोककल्याणाशी जोडतात. धर्म, सामाजिक दर्जा आणि संपत्ती ही सत्ता, वर्चस्व आणि अधिकार यांचे स्त्रोत राहिली असल्याचे ते सांगतात. त्यांची धर्मसंकल्पना ही वैश्‍विक धर्माचीच आहे. विवेकानंदांनीदेखील ‘वैश्‍विक धर्म’ हीच संकल्पना मांडली आहे. हिंदू धर्माचे पारंपारिक स्वरूप मांडतांना डॉ. आंबेडकरांनी त्याचे स्वरूप हे नियम, कायद्याचे असून ती कायदेशीर वर्ग-नैतिकता असल्याचे म्हटले आहे. डॉ. आंबेडकरांचा धर्मविचार हा सामाजिक आणि माणसाच्या ऐक्याची मांडणी करणारा भौतिक, इहवादी धर्माचा आहे, आधिभौतिक नव्हे. धर्मात नैतिकता असणे, तीच समाज चालवण्याचे नियंत्रक तत्त्व असणे, धर्म तर्काधिष्ठित असणे, धर्माच्या नैतिक संहितेने स्वातंत्र्य, समता, बंधुता मान्य करणे हे बाबासाहेबांच्या मते आवश्यक आहे. अन्यथा धर्म लयाला जाईल, असे त्यांचा धर्मविचार सांगतो.
त्यांच्या मते, धर्म हा आत्म्याच्या व्यक्तिगत मुक्तीच्या अवस्थेतून नंतरच्या नैतिक आचरणासाठी बंधुभाव जोपासनावस्थेत, त्यानंतर जीवनगरजांची पूर्तता केलेल्यांचे पूजन अशा अवस्थांमधून गेलेला आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, असे मत डॉ. आंबेडकरांचा चिकित्सक अभ्यास करणार्‍या वामन नारायण कुबेर यांनी नोंदवले आहे. डॉ. आंबेडकरांचा धर्मविचार हा धर्माचे आधिभौतिक स्वरूप नाकारणारा विचार आहे. बुद्धानेही धर्माचे आधिभौतिक स्वरूप आणि कर्मविपाक सिद्धांत नाकारलेलाच होता.


अस्पृशांच्या मुक्तीसाठी राजकीय आधारांचीच गरज


अस्पृश्यांची मुक्ती ही तीर्थयात्रा आणि उपासतापास करून होणार नाही, तर त्यासाठी राजकीय अधिकारांचीच गरज आहे. ईश्‍वरोपासनेपेक्षा रोजची भाकरी महत्त्वाची असल्याचे बिंबवण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मोठे यश लाभले होते. लोकशाहीत राज्यसंस्था ही धर्म नियंत्रित करणार नाही, तर धर्मावरही राज्यसंस्थेचे नियंत्रण असेल, अशी जी तरतूद भारतीय राज्यघटनेत केली गेली, तिचा आधारच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धर्मसंकल्पना हा होता. हीच धारणा घटना समितीत त्यांचे सहकारी असणार्‍या डॉ. पंजाबराव देशमुख यांचीही होती. दोघेही विवेकानंदांप्रमाणे खर्‍या धर्माचे स्वरूप विशद करणारी धर्मचिकित्सा करीत होते. खर्‍या धर्माला कर्मकांडाधारित पुरोहित धर्माचे रूप हे नंतर प्राप्त झाले. त्यामुळे खरा व मूळ धर्म हा पुरोहित धर्म नसल्याचेच विवेचन ते करत होते. त्यायोगे कोणत्याही अज्ञात, अदृश्य शक्ती आणि असहाय्य माणूस यांच्यात निर्माण झालेली व त्यावर उपजीविका करणारी मध्यस्थ यंत्रणा ही खर्‍या धर्मापासून त्यांनी वेगळी केली.


एकट्या माणसाला धम्माची गरज नसून ती सामाजिक गरज


जातिविहीन समाजरचना आणि समता मान्य करणारा हिंदू धर्म त्यांना स्वराज्यासाठी हवा होता, त्याशिवाय जातिव्यवस्थेची गुलामगिरी संपणार नव्हती. डॉ. बाबासाहेब यांची धर्मसंकल्पना ही व्यक्तीच्या उन्नतीबरोबरच तर्क आणि नैतिकता यावर आधारलेली व इहलोकनिष्ठ अशी आहे. ती पूर्णपणे इहवादी धर्मसंकल्पना आहे. ती धर्मालाच सेक्युलर स्वरूप देणारी आहे. सेक्युलर शब्दाचा अर्थ ऐहिक असाच आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटनेत ऐहिकता हाच मानवाच्या सामाजिक कल्याणाचा आधार आहे. बाबासाहेब धर्म आणि धम्म यात भेद करतात. धर्म हा व्यक्तिगत तर धम्म हा सामाजिक, सार्वजनिक असल्याचे ते स्पष्ट करतात. त्यांच्या धम्मामध्ये प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड, बळी अशा बाबींना स्थान नाही. त्याचे स्वरूप माणसामाणसातल्या योग्य नैतिकतेचे आहे. एकट्या माणसाला धम्माची गरज नसून ती सामाजिक गरज आहे, असे त्यांचे मत आहे. त्यांचा धम्मविचार हा ईश्‍वरश्रद्धा, आत्म्याचे अस्तित्व, पूजा, आत्म्याची शुद्धी या सर्व बाबी नाकारणारा, त्या धर्मबाह्य ठरवणारा विचार आहे.
कुबेरांनी त्यांच्या प्रबंध ग्रंथात म्हटल्याप्रमाणे, नव्वद टक्के ख्रिश्‍चन धर्म हा बौद्ध धर्मापासून घेतलेला आहे, असे बाबासाहेब म्हणत. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे श्रीकृष्ण, बुद्ध, ख्रिस्त आणि मोहम्मद पैगंबर बाबासाहेबांना यासाठी आवडत, की त्यांनी त्यांच्या आज्ञा नव्हे, तर माणसाने त्याच्या विवेकाच्या आज्ञा पाळाव्यात असे ते सांगतात, असे बाबासाहेब म्हणतात. बौद्ध धर्मात ईश्‍वराची जागा नैतिकतेला देण्यात आली आहे. बाबासाहेबांना म्हणूनच बौद्धविचार अधिकच प्रिय वाटला. लोकशाहीत पुरोहित धर्माचा पुरस्कार करणारी दैवते उपयोगाची नाहीत. ईश्‍वराची जागा नैतिकतेला देणारा धर्मविचार हा लोकशाहीला सुसंगत त्यांना वाटत होता. चातुर्वर्ण्य घालवायला बुद्धाशिवाय दुसरा मार्ग नव्हता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धर्मचिकित्सा ही समाजशास्त्रीय पद्धतीची होती. विठ्ठल रामजी शिंदे, भांडारकर, राजारामशास्त्री भागवत, न्या. रानडे, डॉ. भाऊजी दप्तरी, डॉ. पंजाबराव देशमुख हे सारेच समाजशास्त्रीय अंगानेच धर्मचिकित्सा करीत होते. गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिघेही राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी खर्‍या धर्माचा आधार उभा करत होते. मात्र बाबासाहेबांना त्यासाठी सर्वाधिक उपयोगी धर्मविचार हा बुद्धाचाच दिसत होता.


बाबासाहेबांचा धर्मविचार हा कायदा आणि धर्माची मूलतत्त्वे यांच्यात सुसंवादित्व स्थापणारा


संसदेत हिंदू कोड बिलावर बोलतांना त्यांनी धर्मनिरपेक्ष वा इहवादी राज्याचा अर्थ लोकांच्या धर्मभावनांचा राज्य आदर करणार नाही वा ती विचारातच घेणार नाही, असा नसून त्याचा अर्थ संसद कोणताही विशिष्टच धर्म लोकांवर लादू शकणार नाही, असा सांगितला आहे. त्यांच्या मते, धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे लोकांचे आपापले धर्म गुंडाळून ठेवणारे राज्य नव्हे. बाबासाहेबांचा धर्मविचार हा देशाचा कायदा आणि धर्माची मूलतत्त्वे यांच्यात सुसंवादित्व स्थापणारा धर्मविचार आहे. धर्म आणि कायदा यात तो विसंगती निर्माण करीत नाही. ईश्‍वराचे अस्तित्व, ईश्‍वराचे कल्याणकारी वैश्‍विक शासन आणि ईश्‍वराचे नैतिक शासन यापैकी धर्माचा अर्थ हा अशी आदर्श व्यवस्था, जिथे लोक नैतिक आचरणाच्या व्यवस्थेत असतील, तीच त्यांची धर्मसंकल्पना आहे.


विषमता हा हिंदू धर्माचा आत्मा


मनू आणि नित्शे यांची तुलना करताना बाबासाहेबांनी मनू हा विशिष्ट वर्गाचे विशेषाधिकार सुरक्षित राखतो, तर नित्शे हा विद्यमान मानववंशापेक्षा अधिक उन्नत अशा श्रेष्ठ मानवाचा वंश निर्माण करू इच्छितो, जो तर्काधिष्ठित असेल. मनूचा सुपरमॅन हा जन्मजात जातिश्रेष्ठत्वाने ठरतो, असा भेद बाबासाहेबांनी दाखवून दिला आहे. कर्तृत्वाने नव्हे, तर जन्माने माणसाचे श्रेष्ठत्व ठरवणार्‍या धर्माला डॉ. आंबेडकरांचा धर्मविचार हा मानवताधर्म मानत नाही. हिंदू धर्माविषयी त्यांची टीका यामुळेच असून त्याला ते मानवतावादी धर्म मानत नाहीत. विषमता हा त्यामुळे हिंदू धर्माचा आत्मा असल्याचे ते सांगतात. वर्गविशिष्टांची नैतिकता सामान्य माणसांच्या कामाची नाही. हिंदुत्वाला ते त्यामुळे Superman’s heaven and the common man’s damnation, श्रेष्ठांचा स्वर्ग तर सामान्यांचा शाप मानतात.
विनायक दामोदर सावरकरांनी बुद्ध धर्मातील अहिंसेवर चढवलेल्या हल्ल्यांबाबत उत्तरे देताना बाबासाहेबांनी हिंदू धर्मात ईश्‍वर आहे, बुद्ध धर्मात तो नाही. हिंदू धर्मात आत्मा आहे, बौद्ध धर्मात त्याला स्थान नाही. हिंदू धर्मात चातुर्वर्ण्य आणि जातिव्यवस्थेला महत्त्व आहे, बौद्ध धर्मात ते नाही, हे स्पष्ट केले होते. बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे धर्मांतर करताना या देशाचा इतिहास आणि सांस्कृतिक परंपरा यांना हानी पोहोचणार नाही, याची काळजी घेतली गेल्याचेही ते सांगतात. हिंदू धर्मासह कोणत्याही धर्माचे ते विरोधक नव्हते, तर ज्या धर्मात जन्माला आले त्यातला धर्मविचार शास्त्रीय, तार्किक, मानवीय पातळीवर आधुनिक करण्याच्या दृष्टीने त्याची परखड चिकित्सा ते आयुष्यभर करत राहिले. त्यांच्या धर्मविचारात धर्माचा महत्त्वाचा निकष हा धर्माची व्यक्तिगत उपयुक्तता नसून मानवाची प्रतिष्ठा व मानव अधिकार जपणारी त्याची सामाजिक उपयुक्तता असणे, हा आहे. हा धर्मविचार मांडण्यासाठी त्यांनी सर्व प्रमुख धर्मांचा तौलनिक अभ्यासही केला होता. त्यांच्या धर्मसंकल्पनेत कोणत्याही धर्मात तो नाकारण्याचे वा कोणताही स्वीकारण्याचे स्वातंत्र्य असणे महत्त्वाचे आहे. व्यक्तीची सर्व बंधनातून मुक्तता, धर्माची सामाजिक उपयुक्तता आणि वैयक्तिक नीतिमत्ता हे त्यांचे धर्मासाठीचे निकष होते.


धर्म ही तत्त्व आहेत, नियम नव्हे


बौद्ध धर्मदेखील पारंपरिक, जसाच्या तसा त्यांनी स्वीकारलेला नाही, तर त्याचीही चिकित्सा करून, परिष्कृत करूनच तो आधुनिक जीवनार्थाच्या संदर्भात त्यांनी त्यांच्या Buddha and his Dhamma या ग्रंथात मांडलेला आहे. धर्मविचारामागील त्यांची मूळ प्रेरणा मुळात तळागाळातील प्रचंड मोठ्या लोकसंख्येला धर्मातील विषमतेमुळे लाभलेले गौणत्व आणि मानवाधिकाराच्या, मानवी प्रतिष्ठेच्या संदर्भात कुठे स्थानच नसल्याने त्यांना समानत्वच धर्मात लाभत नव्हते, अशा धर्माचे स्वरूप बदलण्याची होती. त्यांचा धर्मविचार हा बुद्धीनिष्ठ, शास्त्रीय आणि सामाजिक उपयुक्ततेचा असून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यत्रयींवर आधारलेला विचार आहे. धार्मिक कलहाला मूर्खपणा मानणारा हा विचार आहे. विवेक, तर्क आणि स्वतंत्र बुद्धीने विचार यांचा विकास धर्माने अवरूद्ध करायला नको, अशी त्यांची धारणा आहे. त्यांच्या मते धर्म ही तत्त्व आहेत, नियम नव्हे.
डॉ. आंबेडकरांचा धर्मविचार हा मुळातच एकूण धर्म या संकल्पनेचाच पुनर्विचार असून तो धर्माला अधिक न्याय्य आणि सुयोग्य पायावर उभा करणारा धर्मविचार ठरलेला आहे.सामजिक परिवर्तनाला बांधलेला तो विचार आहे.

– डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी
(लेखक अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.