देशभरात पसरतेय आता  नोकर्‍या बदलण्याची साथ…

देशभरात पसरतेय आता  नोकर्‍या बदलण्याची साथ…

भारतात आणि एकूणच जागतिकीकरण-खाजगीकरणाच्या प्रक्रियेत कोणत्या लाटा कधी येतील आणि ‘किनारा तुला पामराला’ या कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळीला भेदून किनारा पार करत नागरी वसाहतीत कधी घुसतील याचा नेम राहिलेला नाही. सध्या जगात बेकारीची लाट प्रचंड स्वरूप धारण करते आहे. कोट्यवधी तरुण रिकामे मनगट आणि मन घेऊन फिरत आहेत. नव्यांना नोकर्‍या नाहीत आणि ज्यांच्याकडे होत्या त्या खाजगीकरण, यांत्रिकीकरण आणि अधिक नफा कमावण्याच्या शर्यतीत गायब होत आहेत. बेकार झालेले काहीजण आत्महत्या करत आहेत, काही गुन्हेगारी जगतात जात आहेत, तर काही बुवाबाबांच्या नादाला लागत आहेत. औद्योगिक क्रांतीच्या वेळी ज्या संस्थांत खूप मजूर किंवा कामगार त्या प्रसिद्ध मानल्या जायच्या. लाखो कामगारांना सामावून घेऊन उद्योगधंदे करणार्‍या कंपन्या जगात होत्या. माणसाच्या जागी यंत्र आलं. माणसाच्या जागी नफा आला. कंपन्यांमध्ये कामगारांचा वावर कमी होऊ लागला. त्यांची जागा रोबोटने, यंत्रांनी घेतली. यांत्रिकीकरणाने पहिला हल्ला केला तो माणसाच्या तोंडात जाऊ पाहणार्‍या घासावर. जेथे माणसाचा घाम गळायचा आणि त्याला कोरभर भाकरी मिळायची त्या जागा भांडवलशाहीने यंत्राला दिल्या. कमीत कमी कामगार म्हणजे जास्तीत जास्त नफा हे सूत्र पुढं आलं आणि बेकारी नंगी होऊन नाचू लागली. रोज किती लोकांना नोकर्‍या लागल्या याऐवजी रोज किती नोकर्‍या गेल्या, याचेच आकडे आपण वाचत आहोत. बेकारीचा शेवट काय, महागाईचा शेवट काय, भांडवलशाहीचे शेवटचे मुक्कामाचे ठिकाण कोणते आणि तेथे कोण असणार आदी प्रश्‍न रोज चघळत, लाळ गाळत आपण पुढे जात आहोत. कुत्र्याच्या तोंडात असलेल्या हाडासारखे हे आहे. कोणताही कुत्रा पोट भरते म्हणून हाड चघळत नाही, तर लाळ गळते म्हणून चघळत असतो. लाळ गळल्यामुळे पोट भरल्यासारखा भ्रम होतो. या भ्रमातच कुत्र्याप्रमाणे अनेक बेकार जगत आहेत. ते देशाचे नागरिक आणि मालक आहेत. ‘आम्ही भारतीय लोक’ असं राज्यघटनेत त्यांच्यासाठी अगदी प्रारंभीच लिहून ठेवलंय.
बेकारीच्या दाहकतेबद्दल, तिच्या चटक्याबद्दल चर्चा चालू असतानाच दुसरी एक बातमी भारतात येऊन धडकली. अर्थात, ती भारतातीलच बातमी आहे. कुणाला ती आश्‍चर्यकारक वाटेल, कुणाला धक्कादायक, तर कुणाला आपण नेमके कुठं निघालो आहोत, असा प्रश्‍न विचारणारी असेल. भारतात खाजगी क्षेत्रात ज्यांना नोकर्‍या लागल्या, जे सध्या नोकर्‍या करत आहेत अशांपैकी 90 टक्के लोक आपली सध्या असलेली नोकरी सोडून नवी नोकरी पकडण्याच्या विचारात आहेत. अशामध्ये साठ-सत्तर टक्के तरुण आहेत, ज्यांना अलीकडेच नोकरी लागली आहे. बाकी चाळीशीच्या पुढे आहेत. हा निर्णय अशा परिस्थितीत घेतला जातोय, की ज्यावेळी नव्या नोकर्‍या तयार होण्याचे प्रमाण सुमारे तीस टक्क्यांनी घटले आहे. अशा वेळी नोकर्‍या सोडण्याचा निर्णय आणि नव्या नोकर्‍यांचा शोध घेण्याचा प्रयत्न धाडशीच म्हणावा लागेल. अर्थात, हे धाडस आपोआप आलेले नाही, तर लादले गेले आहे. एक प्रकारची सक्ती तयार करण्यात आली आहे. भविष्यावर कोणी तरी काळा रंग अंथरला आहे, असे काही या लोकांना वाटते आणि ते खरेही आहे. कर्ज काढून अतिशय कष्टानं ज्यांनी शिक्षण घेतलं, त्यांना नोकर्‍याही कष्टानेच मिळाल्या आहेत. काही का असेना; पण नोकरी मिळाली या आनंदात ते होते. पीएच.डी. झालेल्यांना शिपायाची नोकरी मिळाली, एम.ए. झालेला मजुराचं काम करू लागला, तर काही कंपन्यांतील नोकर्‍यांवर खूश होते. नोकरी मिळताच काहींनी लग्ने केली. काहींनी चार-पाचशे फुटांचं घर घेतलं, काहींनी मोटार घेतली. या सर्वांनाच वाटत होतं, की पुढे मागे आपला पगार वाढणार आहे, बढती मिळणार आहे. वेगवेगळ्या गोष्टींत कर्ज काढून, व्याज भरून केलेली गुंतवणूक फळाला येईल; पण तसं घडणार नव्हतं. नोकरीच्या वेळी मिळालेला आणि सुरू झालेला पगार जागच्या जागीच अडकला. त्याला पाय फुटले नाहीत. शेंबडात माशी अडकावी त्याप्रमाणं विशिष्ट आकड्यांतच पगार अडकला. आहे त्या पगाराच्या थोबाडीत मारण्यासाठी महागाई आली. नोकरकपात आली. लांब लांब पल्ल्यांवर आहे त्या पगारावरच बदल्या आल्या. प्रारंभी दिलेल्या अनेक सोयी सवलती काढून घेण्यात आल्या. कामाचे तास वाढविण्यात आले. कर्जाचा हप्ता थकायला लागला आणि व्याज वाढायला लागले. पगार वाढवून द्या असं जो कोणी म्हणेल त्याला नोकरी सोड, तुझ्यापेक्षा कमी पगारात नोकरी करू पाहणारे अनेकजण रांगेत आहेत. म्हणजे बसमध्ये यायची संधी आहे; पण बसायला जागा नाही. किती वेळ ताटकळत उभं राहायचं, याचं गणित नाही. विशेष म्हणजे, आहे ती नोकरी कंत्राटी. कंत्राट संपत आलं, की नवे नियम, नव्या अटी. नोकरीविषयी कसलीही शाश्‍वती नाही. तिची एक्सपायरी डेट नाही. अशा परिस्थितीत एक दोन नव्हे, तर कोट्यवधी नोकर, कामगार अडकले आहेत. नोकरी लागल्यामुळे जन्माला आलेली अनेक रंगीबेरंगी स्वप्ने सुकू लागली, मतिमंद-अपंग होऊ लागली. आता काय करायचं? सरकारी क्षेत्रात दहा जागांसाठी एक लाख स्पर्धेत उतरले आहेत. अशा नोकर्‍यांच्या नादाला लागून अनेकांनी आपलं वय गमावलंय. रांगेत राहून अनेकांनी आपल्याच मुठीतील स्वप्नं स्वतःच जोर लावून चुरगळून टाकली आहेत. जणू काही स्वप्न पाहणं धोकादायक, सपना देखना मना है… वगैरेसारखं. खाजगीत नोकरी करणार्‍यांचं नोकरी लागूनही असंच घडत आहे. फिक्स पे मध्ये किंवा लंगडत चालणार्‍या पगारामध्ये आता काही भागात नाही म्हणून थोडाफार पगार वाढवून देणार्‍या दुसर्‍या कंपन्यांमध्ये जाण्याचा विचार ते करत आहेत. अर्थात, तेथेही श्रम शोषणारी नवी भांडवलशाहीच आहे. ती कामगारांना बरं वाटावं म्हणून मोठमोठी पदे देते आणि पगारवाढीचा प्रश्‍न आला, की मौनात जाते. बाहेरचा रस्ता दाखवते. नोकरीतून काढून टाकण्यासाठी कोणता निपत्र-कायदा वापरला जात नाही. कारण तो फेकून देण्यात आला आहे. वर्षानुवर्षे लढवून मिळवलेल्या कामगार कायद्याची वाट लागली आहे. बेकायदेशीरपणे कामाचे तास वाढवून, आहे त्या पगारात शोषण केलं जातं. प्रतिकार केला, प्रश्‍न विचारला की नोकरी गेली. जागतिकीकरणातले हे नवे गुलाम आहेत. कधीही नोकरी सोडण्याचा आणि कुठंही हात पसरत जाण्याचा त्यांना हक्क आहे. नवे गुलाम कोणा एकाच्या सात-बारावर नाहीत. त्यांचे मालक सतत बदलत राहतात. जसे की, आताचे कंत्राटी कामगार आपला मालक बदलण्याचा विचार करत आहेत. कोणी तरी नवा मालक येईल आणि फाटलेल्या पगाराला ठिगळ लावेल, निदान रफू तरी करेल, अशी त्यांची स्वप्ने आहेत. या सर्वांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना म्हणजे या स्थलांतर करू पाहणार्‍या पक्ष्यांना नवं सरोवर मिळणार आहे, का गवतानं भरलेलं नवं कुरण मिळणार आहे, हा प्रश्‍न पुन्हा वेताळासारखा लटकलेलाच राहणार आहे. कोणत्या गावात या असहाय्य पक्ष्यांचं आणि तुटपुंज्या पगारात जगताच येत नाही, असा टाहो फोडणार्‍या पक्ष्यांचं काय होईल सांगता येत नाही. फक्त आणि फक्त त्यांचेच चेहरे टिपण्यासाठी व्यवस्थेकडे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. एक तर हे पक्षी लज्जास्पद होऊन चेहरे लपवत जातील किंवा त्यांना तसं भाग पाडलं जाईल. नोकर्‍या आणि पगार आकसण्याच्या काळात, यंत्रासारखा तगडा स्पर्धक मैदानात उतरल्याच्या काळात या सर्वांचं काय होणार, याचा विचार ना राज्यघटनेत आहे, ना लाल किल्ल्यावर आहे, ना कोणत्या पक्षाच्या अजेंड्यावर आहे! धुमसता असंतोष किती काळ धुमसतच राहणार आहे, याचं गणितही कुणाकडे नाही. पक्ष्यांकडे तर नाहीच नाही. कारण प्रश्‍न विचारला, की नोकरी जाते.

– तात्या विंचू 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.