भट्टी पक्षाची असो वा अपक्षाची चकाकते ते ‘तांबे’च

भट्टी पक्षाची असो वा अपक्षाची चकाकते ते ‘तांबे’च

नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबेच निवडून येणार हे सर्वांनाच ठाऊक होते. त्यासाठी कोणाच्या भाकिताची अथवा कोणत्या पाहणीची गरज नव्हती. सहकार क्षेत्राचा राजकारणासाठी बळकट सोपान तयार करून सत्तेपर्यंत पोहोचणारे महाराष्ट्रात पन्नासेक तर घराणी आहेत. त्यात एक थोरात-तांबे घराणे आहे. या घराण्याला दीर्घ राजकीय परंपरा आहे. या घराण्याने विश्‍वासार्हता व प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. या घराण्यात एक-दोन वर्षे नव्हे, तर पन्नासहून अधिक वर्षे विधिमंडळ राखून ठेवले आहे. बाळासाहेब थोरात यांची चाळीस, त्यांच्या सख्ख्या बहिणीचे पती असलेल्या डॉ. तांबे यांची पंधरा अशी ती 50 वर्षे होतात. तांबे यांच्या पत्नीची नगरपालिकेतील कारकीर्द त्यात समाविष्ट केली, की ही वर्षे वाढत जातात. अर्थात, हे थोरात घराण्याविषयीच नव्हे, तर पवार, चव्हाण, देशमुख, शिंदे, पाटील, मुंडे, राणे आदी अनेक घराण्यांपर्यंत नेता येते. सगळ्याच पक्षात कमी-अधिक प्रमाणात घराणेशाही आहेच. सत्तेचे केंद्रीकरण करून ते घराण्यांमध्ये गुंतवण्यासाठी लोक जबाबदार आहेत. लोकशाहीतही त्यांना प्रतिनिधीऐवजी कोणी तरी मालक हात जोडण्यासाठी लागतो. लोकही घराणेशाहीला जबाबदार आहेत. आपणच मालक आहोत आणि आपला कोणी मालक नाही, हे ज्या दिवशी लोक ठरवतील त्या दिवशी सत्तेचे विकेंद्रीकरण करणारी लोकशाही जन्माला येईल. तोपर्यंत आजोबा, मुलगा, नातू आणि पणतू असाच सिलसिला चालू राहणार आहे.
डॉ. तांबे यांनी काँग्रेसने दिलेले तिकिट का नाकारले, यामागे त्याग वगैरे काही नाही, तर आपल्या मुलाला संसदीय राजकारणात जाण्यासाठी त्यांना जागा मोकळी करून द्यायची होती. अर्थात, ही गोष्ट काही लपून राहिलेली नव्हती. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सत्यजित निवडणूक लढवू शकले नसते, कारण तेथून मामेबहिण प्रमोट करायची आहे. विखे पाटलांच्या इलाख्यात जाऊन विधानसभा लढवली की पराभव होतो, याचा अनुभव त्यांना आहेच. वडिलांनी वॉटरप्रूफ केलेल्या विधान परिषद मतदार संघाशिवाय त्यांना पर्याय नव्हता. नव्या पर्यायाची वाट पाहण्यात आणि तो मिळण्यात किती वर्षे गेली असती, हे सांगता येत नाही. शेवटी बापाचे संचित मिळवून हनुमान उडी मारायची असेल, तर अपक्ष म्हणून लढण्याशिवाय पर्याय नव्हता. ज्यांच्या अनेक पिढ्या काँग्रेससोबत वाढल्या, काँग्रेसचा एक भाग बनल्या, त्यांना भाजपमध्ये जाण्याचा निर्णय झटपट घेता आला नसता. डॉ. तांबे यांनी तयार केलेले बहुतेक मतदार काँगे्रसचे आहेत. त्यांना सोडून भाजपमध्ये जाणे जोखमीचे होते किंवा भाजप गेमही करू शकली असती. सगळेच्या सगळे मतदार जे दोन-तीन दशके काँग्रेसबरोबर आहेत ते भाजपबरोबर जाऊ शकले असते का, हाही प्रश्‍न आहे. काँग्रेसमधील काहींनी अन्याय केला असे तुणतुणे वाजवणे सोपे होते. बंडाला सहानुभूती मिळाली असती. प्रत्येक उमेदवाराचे असेच असते. तिकिट मिळाले की न्याय आणि नाही मिळाले, की अन्याय. काँग्रेसने तांबे पिता-पुत्रावर कारवाई केल्याचा फरक काही पडणार नव्हता. कारण मतदारसंघाची बांधणी खूप चोख होती आणि विरोधी उमेदवार टिकणार नव्हता, हे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. पक्ष कोणताही असो किंवा नसो; पण भट्टीतून बाहेर पडून जास्त चकाकते ते ‘तांबे’च, या उक्तीची प्रचिती आली आहे आणि राजकारण किंवा लोकशाही घराणेशाहीच्या जबड्यातून बाहेर पडत नाही, हेही सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रात अशी अनेक कुटुंबे सांगता येतील, की त्यांनी स्वतःहून आणि सत्तेसाठी स्वतःला वेगवेगळ्या पक्षात विभागून घेतले आहे. वडील एका पक्षात तर भाऊ दुसर्‍या पक्षात, एक भाऊ एका पक्षात तर दुसरा दुसर्‍या पक्षात, सासरा एका पक्षात तर जावई दुसर्‍या पक्षात, असा प्रकार आहे. डॉ. तांबे यांच्या मनात जर मोठी पक्षनिष्ठा असती आणि पक्षादेश मानून त्यांनी स्वतःच निवडणूक लढवली असती, तर ते स्वतः निवडून आले असते. याविषयी त्यांच्या राजकीय शत्रूंनाही शंका नव्हती. इथे पक्ष प्रेमाऐवजी पुत्र प्रेम प्रभावी ठरले आणि त्यासाठी वडील किती त्याग करू शकतो, याचेही एक उदाहरण तयार झाले. वडिलांनीही प्रारंभी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. आता मुलानेही तोच धडा गिरवला. कारण तो अधिक सुरक्षित होता. परिस्थिती अशी आहे, की कोणा एका कुटुंबाला दोष देता येत नाही. भारत जोडो यात्रेत अनेक पुढार्‍यांनी आपल्या लेकराबाळांना कसे समोर केले, हेही आपण पाहिलेच आहे. काँग्रेसमध्ये या आणि नेेतेपद मिळवा, अशी एकेकाळी जाहिरात करणार्‍या सत्यजित यांनी जेव्हा आमदार होण्यासाठी पोकळी तयार झाली, तेव्हा ती स्वतःच भरून काढली. त्यांच्यावर विश्‍वास टाकून पक्षात राब राब राबणार्‍या कोण्या सच्च्या कार्यकर्त्याला ही संधी दिली असती, तर महाराष्ट्रात सत्यजित ऐवजी त्यागजित निर्माण झाला असता. अर्थात, ही झाली कवी कल्पना. कारण राजकारण त्यागावर नव्हे, तर स्वार्थावर उभे असते.

-तात्या विंचू 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.