वादांमुळं गाजलं मुस्लिम मराठी साहित्य संमेलन – कलीम अजीम

वादांमुळं गाजलं मुस्लिम मराठी साहित्य संमेलन – कलीम अजीम

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी वर्तमान राजकारणावर भाष्य करताना म्हटलं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिलं जाणारं शासकीय अनुदान बंद करावं. हा सगळा पैसा अशा छोट्या साहित्य संमेलनाकडे वळवावा. कारण त्या संमेलनातून जत्रेशिवाय दुसरं काहीच होत नाही. जेव्हा माणसांनी तयार केलेल्या विविध व्यवस्था फितूर होतात, बेईमान होतात, तेव्हा साहित्यिकाची जबाबदारी वाढते आणि समाज सगळा त्याच्यामागे जात असतो. वर्तमान अवस्थेत कोणत्याही यंत्रणा प्रामाणिक राहिलेल्या नाहीत. आजचा काळ असा विचित्र आहे, की कुठे पाऊल ठेवलं तर कुठे स्फोट होईल हे सांगता येत नाही.

तब्बल 22 वर्षांनी नाशिकमध्ये भरलेलं मुस्लिम मराठी साहित्य संमेलन अनेक वादांनी गाजलं. दोन साहित्य संस्थांचा वाद व नंतरचा घटनाक्रम त्यातील प्रमुख बिंदू होता. पहिलं, 1990 साली सोलापूरला स्थापन झालेल्या मुस्लिम मराठी साहित्य परिषदेने 2009 साली औरगाबादला शेवटचं संमेलन भरवलं होतं. त्यानंतर 14 वर्षांनी साहित्य परिषदेने नाशकात सदरील मेळावा घेतला. यापूर्वी 2000 मध्ये असंच संमेलन नाशिकला झालं होतं. चर्चेत येण्याचं दुसरं प्रमुख कारण म्हणजे, अध्यक्ष म्हणून निवड झालेले अब्दुल कादर मुकादम यांचं पूर्वाश्रमीचं मुस्लिम सत्यशोधक मंडळाचं सक्रिय सदस्यत्व ग्रहण करणे. कारण आजही महाराष्ट्रातील मुस्लिम समुदाय हमीद दलवाईंना मुस्लिमविरोधी धोरणांचा प्रचारक मानतो. वेळेचं भान राखून अध्यक्षांनी, मी दलवाई विचारांपासून फारकत घेऊन एक तप लोटला आहे, तसंच मी मंडळाचा सदस्य व विचारांचा समर्थक नसल्याचा ऑडिओ खुलासा केला. त्यामुळे तो विरोध तिथंच मावळला.
तिसरं कारण म्हणजे विहिंप, आरएसएस व त्यांच्या समविचारी ‘विवेक’सारख्या ब्राह्मणी व हिंदुत्ववादी विचारांच्या संस्था, संघटना व प्रचारकांनी संमेलनाचा घेतलेला धसका! शेवटचा आठवडा संघविचारांच्या अपप्रचारामुळे नाशिकचं मुस्लिम मराठी साहित्य संमेलन गाजलं.
नियोजित वेळेच्या दीड-दोन तास उशिरा संमेलन सुरू झालं. उद्घाटन समारंभाला ‘द वायर’च्या सुप्रसिद्ध न्यूज अँकर व पत्रकार आरफा खानम शेरवानी येणार होत्या. विमान तिकिटाची व्यवस्था करूनही काही कारणास्तव त्या पोहचू शकल्या नाहीत; परंतु त्याच दिवशी त्यांनी राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’साठी श्रीनगरच्या लाल चौकात उपस्थित असल्याचा फोटो ट्विटरवर अपलोड केला होता. म्हणजे श्रीनगरहून त्यांना नाशिकचं अंतर वेळेत कापता आलं नाही. संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी परिसरातून दिंडी काढण्यात आली. तसंच इकरा अरबी मदरसा इंग्लिश स्कूलच्या वतीने दिंडीत पथनाट्य सादर केलं. भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहातील प्रा. फकरुद्दीन बेन्नूर साहित्यनगरीत संमेलनाची सुरुवात दुपारी सव्वा बाराच्या सुमारास कुरआनच्या आयात पठणाने झाली. इरशाद पीरजादे यांनी आपल्या सुमधूर आवाजात ‘आयात’, तर इकबाल मुकादम यांनी ‘नात ए पाक’ सादर केली. त्यानंतर डॉ. युसूफ बेन्नूर आणि उपस्थितांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन केलं. वृक्षास जलपान करून संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं.
प्रमुख संयोजक डॉ. फारुख शेख यांनी वर्तमान फूटपाड्या राजकीय स्थितीत सदरील संमेलन का घ्यावे लागत आहे, याची मीमांसा केली. संमेलन फक्त भाषाप्रेमींचा सोहळा नसून भारतीय व मराठी मुस्लिमांची राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक अभिव्यक्ती असल्याचं त्यांनी म्हटलं. धर्म, जातीच्या नावाने भेद निर्माण करणार्‍या विघातक शक्तींना उत्तर देऊ पाहणारा हा सांस्कृतिक प्रयत्न आहे, असंही त्यांनी म्हटलं. उद्घाटक माजी राज्यसभा सदस्य हुसैन दलवाई, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, प्रमुख संयोजक डॉ. फारुख शेख, स्वागताध्यक्ष व अध्यक्षासह एकूण 20 जण उद्घाटन मंचावर उपस्थित होते. हुसैन दलवाई यांनी राज्यातील प्रादेशिक मुस्लिम व भाषेचा अनुबंध उलगडून दाखवला. शिवाय अजूनही मोठ्या प्रमाणात मुस्लिम मराठीपासून अलिप्त असल्याचीही खंत व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी वर्तमान केंद्रीय व राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या मुस्लिमविरोधी धोरणांचा समाचार घेतला. मराठी भाषेची मक्तेदारी मिरवणार्‍या ब्राह्मणी प्रवृत्तीवरदेखील त्यांनी बोट ठेवलं.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी वर्तमान राजकारणावर भाष्य करताना म्हटलं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिलं जाणारं शासकीय अनुदान बंद करावं. हा सगळा पैसा अशा छोट्या साहित्य संमेलनाकडे वळवावा. कारण त्या संमेलनातून जत्रेशिवाय दुसरं काहीच होत नाही. जेव्हा माणसांनी तयार केलेल्या विविध व्यवस्था फितूर होतात, बेईमान होतात, तेव्हा साहित्यिकाची जबाबदारी वाढते आणि समाज सगळा त्याच्यामागे जात असतो. वर्तमान अवस्थेत कोणत्याही यंत्रणा प्रामाणिक राहिलेल्या नाहीत. आजचा काळ असा विचित्र आहे, की कुठे पाऊल ठेवलं तर कुठे स्फोट होईल हे सांगता येत नाही.
प्रस्तावना, स्वागताध्यक्ष, कार्याध्यक्ष, मुख्य संयोजक, प्रमुख पाहुणे इत्यादींच्या लांबणार्‍या भाषणांमुळे अध्यक्षांचे भाषण व वेळ कापली गेली. आयोजकांनी 20 मिनिटात आटोपण्यास सांगितलं आहे, अशा सूचनेने अध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांनी आपलं मनोगत सुरू कलं. मुकादम इस्लामचे अभ्यासक असल्याने त्यांनी इस्लामच्या नीती, धोरण, तत्त्वज्ञान व सुवर्ण युगापासून भाषणाला प्रारंभ केला. इस्लामचा संपूर्ण सार कुरआनमध्ये आलेला आहे. अर्थक्रांतीपासून संस्कृतीपर्यंत प्रत्येक गोष्टीची मांडणी त्यात केली आहे. पूर्वीपासून इस्लामला बदनाम करण्यात येत आहे. सध्या काही हिंदुत्ववादी संघटना तेच कार्य करत आहेत. त्यामुळे समाजात दुष्परिणाम निर्माण होत आहेत. भाषेला कुठलाही धर्म उपस्थित केलेला नसतो. भाषा वाचत नाही तोपर्यंत त्याचा अर्थ समजत नाही. याचा अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली, तरीदेखील अद्याप समग्र क्रांती होऊ शकलेली नाही. क्रांती होण्यासाठी तसेच सर्वांना समान अधिकारासाठी ज्ञानाचा प्रसार करणे आवश्यक आहे. त्यासाठी साहित्य आणि साहित्यिकांची मोलाची भूमिका आहे.
पुढे साहित्य, संस्कृती, लेखनाची प्रेरणा, लिखाणाच्या विविध प्रयोगांवर भाष्य करत त्यांनी म्हटलं, राज्यात अनेक मुस्लिम लेखकांनी मराठीतून लेखन केले आहे. मुस्लिम साहित्य संमेलन हे त्याचे पुढचे पाऊल आहे. याविषयी मुक्त चर्चा होत असेल, तर ते प्रगतीसाठी योग्य आहे. या चर्चेत काही मूलगामी मुद्दे उपस्थित होत असतील, तर त्याचाही विचार केला जाईल.
दुपारच्या सत्रात ‘साहित्य आणि सांस्कृतिक दहशतवाद’ या विषयावरील महापरिसंवाद झाला. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान, प्रा. राम पुनियानी, प्रा. महेबूब सय्यद, साहील कबीर, प्रा. अली निजामुद्दीन, अन्वर राजन, प्रा. जावेद पाशा, प्रा. नारायण भोसले आणि मुजफ्फर सय्यद यांनी भाग घेतला.
प्रा. मुस्तजीब खान यांनी आपले विचार मांडताना म्हटलं, सांस्कृतिक दहशतवादाची चौकट उभी करताना फ्रान्समध्ये काय घडलं, शार्ली हेब्दोवर हल्ला झाला. दिल्लीमध्ये एखाद्याने काही केलं, तर त्या एका घटनेचा, एका माणसाच्या वर्तनाचा ठपका संपूर्ण समुदायावर ठेवला जातो. शेजारी घडणार्‍या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून परदेशात घडणार्‍या विकृत गोष्टींवर लक्ष दिलं जातं. मुस्लिम लेखकांवरील धार्मिकतेच्या पगड्यामुळे ज्या गोष्टी लेखनातून बाहेर यायला हव्यात, त्या येऊ शकत नाहीत, याचाही विचार मुस्लिम साहित्यिकांनी केला पाहिजे.
प्रा. अली निजामुद्दीन यांनी भारतातील जातिभेदावर आधारित समाजाची कोंडी व त्यांच्या अभिव्यक्तींच्या मर्यादांवर भाष्य केलं. धार्मिक वादावर मौन बाळगले जातं, यावर त्यांनी खंत व्यक्त केली. संवेदनशील कवी आणि भाष्यकार साहिल कबीर यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील दहशतवादावर चिमटे काढत म्हटलं, मोहसीनच्या मारेकर्‍यांची सुटका होते आणि आपण काहीच प्रतिक्रिया देत नाही, त्यावर बोलताना शरमेने मान खाली जाणे, हे इथल्या व्यवस्थेने तयार केलेला दहशतवाद आहे. ‘पठाण’ची तिकीटविक्री किती झाली आणि त्याने अंधभक्ताच्या तोंडावर बॉक्स ऑफिस कसं फेकून मारलं, याचा आनंद टीव्ही, इंटरनेट, मोबाईलवर घेत असू तर मोहसीन, बाबरी, अखलाक, पहलू-बिलकीसचे निकाल लागल्यानंतर आपण टाळ्या देत असू, तर दहशतवाद आपल्यावर स्वार झालेला आहे, आपण त्याच्या संमोहनात सापडलो आहोत, असा याचा अर्थ आहे आणि हाच तर सांस्कृतिक दहशतवाद आहे.
अन्वर राजन म्हणाले, खरं बोलल्याशिवाय आपल्या प्रश्‍नाला वाचा फुटणार नाही. दहशतवादाचा सामना आपण मोठ्या प्रमाणात करत आहोत. उद्या कोणाचा नंबर लागेल, याची शाश्‍वती नाही. किती लोक गेले यापेक्षा किती लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. मुस्लिम मराठी संमेलने घेणे म्हणजे हा एक बंडाचा भाग असल्याचं त्यांनी सांगितलं.
ब्राह्मणी दहशतवादावर सडेतोड प्रहार करताना मुंबई विद्यापाठातील प्रा. नारायण भोसले यांनी कथा-कादबर्‍यांतून प्रतीत होणार्‍या कुरघोडीवर बोट ठेवलं. ते म्हणाले, ब्राह्मणी दहशतवादाने शूद्र तथा मनुस्मृतीच्या बंदीची मागणी केली नाही. छत्रपतींच्या अनुषंगानेदेखील हा दहशतवाद पोसण्यात आलेला आहे. त्यातूनच त्यांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हटलं जाते. त्यावर आक्षेप नोंदवला तर पुन्हा ब्राह्मणी दहशतवाद फोफावतो. प्रा. राम पुनियानी यांनी भारतातील राजकीय संकटावर भाष्य करताना म्हटलं, आज साहित्यिकांची जबाबदारी वाढली आहे. साहित्य सांस्कृतिक बदलाची एक पार्श्‍वभूमी तयार करतो. मुन्शी प्रेमचंद नवाबराय नावाने उर्दू भाषेमध्ये लिहीत होते. त्यांनी तत्कालीन सत्तेला आव्हान दिलं होतं. आज भारतीयतेवर जे संकट आलं आहे, त्याचा मुकाबला करण्यासाठीही परिषदेने प्रयत्नशील असावे.
भारतीय समाजात जातिव्यवस्थेचा पाया स्थिर असल्यामुळे इथल्या साहित्यात मुसलमानांच्या विकृतीकरणाची परंपरा उभी राहिली. त्यातून मुसलमानांच्या विकृतीकरणाला सामाजिक अधिमान्यता प्राप्त झाली. त्यामुळे बॉम्बस्फोट खटल्यातील एक आरोपी जनमताच्या जीवावर लोकसभेत पोहोचतो. कोर्टाने एखाद्या माणसाला दोषी ठरवलं आणि शिक्षा ठोठावली, तरीही शासनसंस्था ती शिक्षा माफ करते. एखाद्या महिलेवर बलात्कार होतो, आरोपींवर रीतसर खटला चालला जातो, आरोपींना शिक्षा दिली जाते. तरीही त्यानंतर त्या आरोपींची सुटका केली जाते, त्यांना हारतुरे घातले जातात. त्यामुळे अत्याचाराला सामाजिक अधिमान्यता मिळू लागते, सांस्कृतिक मान्यता मिळते, असं अहमदनगरच्या न्यू आर्ट्स, कॉमर्स कॉलेजचे प्रा. महबूब सय्यद म्हणाले. संध्याकाळी ‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत मुस्लिम वास्तव : अपेक्षा आणि प्रश्‍न’ या विषयावरील परिसंवादात माध्यमतज्ज्ञ कलीम अजीम यांनी आपलं मत माडलं. सुप्रीम कोर्टाने विखारी न्यूज अँकरविरोधात केलेल्या विधानाचा सार सांगत त्यांनी मीडियाला प्रश्‍न विचारण्याचा, त्याची तक्रार करण्याचा व कार्यवाही करण्याचा आग्रह केला. फूटपाड्या मीडियाच्या बातम्यांना बळी न पडता त्याला क्रॉसचेक करण्याची सवय लावा, असंही त्यांनी सूचवलं. याच परिसंवादात डॉ. यूसुफ बेन्नूर यांनी, गेल्या 75 वर्षांतील मराठी साहित्याची मीमांसा करताना त्यातील भेदाभेदांवर बोट ठेवलं व मराठी मुस्लिम लेखकांकडून त्याला आव्हान देण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या. मुस्लिम ओबीसी आंदोलनाचे संघटक हसीब नदाफ यांनी मुस्लिम आरक्षण, सच्चर समिती व वक्फ जमीनीच्या प्रश्‍नावर भाष्य केलं. मुस्लिमांच्या शिक्षणाच्या घसरत्या दर्जावरही भाष्य केलं. अध्यक्षीय समारोपात फ.म. शहाजिंदे यांनी उपाहासाने मुस्लिम समुदायाला कोपरखळ्या मारल्या. ऐहिक जीवनाच्या कल्याणात व्यस्त असलेले मुस्लिम भौतिक विकासासाठी कशाला श्रम घेतील. त्यांना वर्तमान जगापेक्षा ऐहिक जीवनाची अधिक काळजी आहे.
रात्री साडे आठच्या सुमारास फातिमाबीच्या लेकीचं काव्य संमेलन रंगलं. त्यात सुमारे 12 कवयित्रींनी सहभाग नोंदवला. मलेका शेख व नसीम जमादार यांनी सूत्रसंचालन केलं. फरजाना डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या काव्य मैफिलीत रजिया डबीर, तहसीन सय्यद, सुरैय्या जहागीरदार, दिलशाद सय्यद, अलिया गोहर शेख, नेहा गोडघाटे, अख्तर पठाण, सायरा बानू चौगुले, अर्चना राहूरकर, जबीन शेख, समीना कुरैशी, कविता बिरारी यांनी सहभाग घेतला.
त्यानंतर झालेल्या बहुभाषिक काव्य मैफलीत हिंदी, उर्दू व मराठी भाषिक 25 कवी सहभागी झाले होते. मुबारक शेख यांच्या अध्यक्षतेखाली ही काव्यसभा पार पडली. लियाकत नामोले (नाशिक) यांनी उर्दू-हिंदीसाठी, तर अरुण घोडेराव (नाशिक) यांनी मराठीसाठी सूत्रसंचालन केलं. शफी शेख (बोल्डा), अय्यूब नल्लामंदू (सोलापूर), बिस्मिल्ला सोनोशी (बुलडाणा), साहील कबीर (कुरुंदवाड), वाय.के. शेख, (दौंड), बी.एल. खान (बुलडाणा), अहमद पीरनसाब शेख (हिंगोली), जाफर शेख (नांदेड) उपस्थित होते. रात्री उशिरा सुरू झालेल्या या मैफलीत श्रोत्यांची संख्या कमी; पण मंचावर कविंची संख्या मुबलक होती.
दुसरा दिवस 29 जानेवारीला सकाळी संमेलनाध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांची प्रकट मुलाखत साहील कबीर व कलीम अजीम यांनी घेतली. या मुलाखतीत मुकादमांनी बालपण ते नव्वदीपर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास उलगडला. साहील कबीर यांच्या प्रश्‍नांचं उत्तर देताना शिवसेनेचे संस्थापक सदस्य असल्याची त्यांनी कबुली दिली व अद्यापही सेनेचे विचार मान्य असल्याचं सांगितलं. कलीम अजीम यांच्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना लालकृष्ण आडवाणी घरी कसे आले, त्यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर कशी दिली, किरीट सोमय्या यांनी त्यांना कसं उत्तर दिलं, हा रंजक किस्सा सांगितला.
दुपारच्या सत्रात ‘मुस्लिम मराठी साहित्य चळवळीची तीन दशके : साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक अन्वयार्थ’ या विषयावरील परिसंवादात प्रा. फारुख शेख, प्रा. इ.जा. तांबोळी, प्रा. शकील शेख, प्रा. जब्बार पटेल यांनी भाग घेतला. त्यानंतर ‘आम्ही भारताचे लोक’ या विषयावर परिसंवाद झाला. डॉ. अलीम वकील यांच्या अध्यक्षतेखाली जावेद पाशा कुरैशी, डी.एल. कराड इत्यादींनी मते मांडली. प्रा. कुरैशी यांनी वर्तमान लोकसभेत मुस्लिमांच्या प्रतिनिधीत्वावर भाष्य केलं, तर कराड यांनी कष्टकरी व श्रमिकांच्या हक्कांना डावलणार्‍या वर्तमान सरकारवर तोफ डागली. डॉ. अलीम वकील यांनी अध्यक्षीय समारोपात ब्रिटिशांच्या फूटपाड्या राजकारणाचा समाचार घेत, फाळणी, हिंदू राष्ट्रवाद, संघाच्या भेदनीतीवर प्रहार केले.
‘वर्तमान स्थितीतील मुस्लिम मराठी साहित्यातील सामाजिक व सांस्कृतिक वेध’ या विषयावरील परिसंवादात चार वक्त्यांनी भाष्य केलं. विक्रम गायकवाड यांनी हिंदू राष्ट्रवादात दहशतीत लोटलेल्या साहित्यिकांविषयी खंत व्यक्त केली, तर अकबर लाला यांनी हिंदू धर्मांधतेच्या सत्ताकाळात अल्पसंख्याकावर होत असलेल्या हल्ल्याचा समाचार घेतला. डॉ. रफीक पारनेरकर यांनी इस्लामिक साहित्यातील अनुबंध मुस्लिम मराठी परिप्रेक्ष्यात मांडले. इकबाल मुकादम यांनी साहित्यातून कोकणी मुसलमान व त्यांची संस्कृती अदृष्य होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. पुण्यातील एमआयटी विद्यापीठाचे सल्लागार प्रा. एस.एन. पठाण यांनी अध्यक्षीय समारोपात साहित्याने समन्वयाची भूमिका बजावावी, असा सल्ला दिला.


मंजूर झालेले ठराव


(1) राज्य सरकारने मुस्लिम स्वातंत्र्यसेनानींचा कोष तयार करावा.
(2) विज्ञान व संशोधन क्षेत्रात मुस्लिमांना प्रोत्साहन देत आर्थिक तरतूद करावी.
(3) मरहूम माजी आमदार सय्यद अमीन यांची 17 पुस्तके मंत्रालय तथा महाविद्यालयाच्या ग्रंथालयात उपलब्ध होण्यासाठी शासनाने आदेश काढावा.
(4) प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत मुस्लिम विद्यार्थ्यांना दहा टक्के शिष्यवृत्ती द्यावी. केंद्र सरकारने रद्द केलेली मौलाना आझाद संशोधन शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करावी.
(5) वक्फ जमिनीचा वापर मुस्लिम समाजाच्या सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासासाठी करावा.
(6) अलीगड विद्यापीठाच्या औरंगाबाद येथे मंजूर केंद्रासाठी निधी देऊन ते कार्यान्वित करावे.
(7) मुस्लिम आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने योग्य ठरवले आहे, त्यानुसार मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण द्यावे.
(8) मुस्लिम मराठी साहित्याचे विद्यापीठ स्तरावर अध्यासन केंद्र सुरू करावे. मुस्लिम साहित्यनिर्मितीसाठी नवलेखकांना अनुदान व पुरस्कार द्यावेत.
(9) साहित्य संस्कृती मंडळ व राज्यस्तरीय भाषा विकास मंडळाने प्रकाशित केलेल्या मुस्लिमांसंदर्भातील ग्रंथांचे पुनर्मुद्रण करावं.
(10) राज्यातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख यांच्या नावाने राज्यातील सर्व विद्यापीठांत स्वतंत्र अध्यासन सुरू करावं. तसंच फातिमाबी शेख यांच्या नावाने शिक्षिकांसाठी पुरस्कार सुरू करावा.
(11) साहित्य सांस्कृतिक व इतर शासकीय मंडळांवर मुस्लिम साहित्यिकांना योग्य प्रतिनिधित्व द्यावे.

वादाने रंगले साहित्य संमेलन


1. संघ विचारांचे प्रचारक असल्याचा अरोप असलेले प्रा. एस.एन. पठाण व भाजपचे पदाधिकारी विक्रम गायकवाड यांना संमेलनात बोलावल्याबद्दल स्थानिकांनी आक्षेप नोंदवला. गायकवाड भाजपचे सक्रिय पदाधिकारी आहेत, तर प्रा. पठाण हिंदू राष्ट्रवाद्याचे व हिंदुत्ववाद्याचे विचार रेटतात, असा आरोप केला गेला. बाबरी मशिदीवरील ताबा मुस्लिमांनी सोडावा, यासाठी जनमत घेतल्याचं व लोकांचे मन परिवर्तन केल्याचा पठाण यांच्यावर आरोप आहे.
2. बहुभाषिक काव्य मैफलीत उर्दू शायरांनी वर्चस्व गाजवलं. मंचावरील सगळ्या खुर्च्या याच शायरांनी बळकावल्याचं दिसून आलं. त्यामुळे अनेक मराठी कवी नाराज दिसून आले. मराठी साहित्य संमेलनात उर्दू कवींना कशाला बोलावलं, अशी चर्चा संमेलनस्थळी होती.
3. ‘सांस्कृतिक दहशतवाद’ विषयावरील परिसंवादावर ‘साप्ताहिक विवेक’ व ‘तरुण भारत’सारख्या हिंदुत्ववादी पत्राने आक्षेप नोंदवत टीका केली होती. त्या टिपणाचे लेखक प्रमोद पाठक सभागृहात पूर्ण दोन दिवस हजर होते.  
4. संमेलनाला परवानगी मिळवण्यासाठी संयोजकांना खूप शिकस्त करावी लागली. पोलिसांनी बंदिस्त हॉलमध्येदेखील परवानगी नाकारल्याचे सांगण्यात आलं. आदल्या दिवशी ग्रंथदिंडीचा मार्ग बदलण्याच्या अटीवर परवानगी दिली गेली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.